---Advertisement---

10 लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : दिवाळीच्या सणादरम्यान महाराष्ट्रात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी दोन महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून झारखंडमधील फरार नक्षलवाद्याला अटक केली आहे. या नक्षलवाद्यावर झारखंड सरकारने तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दुसरीकडे, गडचिरोली पोलिसांनी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली आहेत. या दोन्ही कारवायांमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोधरे ऊर्फ बुधाराम असे अटक करण्यात आलेल्या ४५ वर्षीय नक्षलवाद्याचे नाव आहे. तो झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील देवगन गावचा रहिवासी आहे. झारखंडमध्ये फरार असलेला हा नक्षलवादी ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली परिसरात लपून बसल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर झारखंड सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

हा नक्षलवादी ठाणे जिल्ह्यात नेमका कोणत्या उद्देशाने वास्तव्यास होता, त्याचे अन्य कोणाशी संपर्क होते का आणि त्याच्या काही घातपाती योजना होत्या का, या दिशेने तपास सुरू आहे. अटकेनंतर त्याला ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गडचिरोलीत स्फोटकांचा साठा जप्त

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांनी माओवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा दलांवर घातपात घडवण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जमिनीत पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० विशेष पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर सुरक्षा पथकांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान अतिदुर्गम आणि आंतरराज्यीय सीमावर्ती भागात तैनात जवानांनी परिसराची कसून तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी जमिनीत लपवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा साठा शोधून काढत जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य घातपाताचा धोका टळल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे ठाण्यात १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद झाला, तर दुसरीकडे गडचिरोलीत माओवाद्यांचा स्फोटकसाठा उघडकीस आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दोन्ही कारवायांमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!