---Advertisement---

‘राम मंदिरात कधीच जाणार नाही’; कीर्ती आझाद यांचे वादग्रस्त विधान

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अयोध्येतील राम मंदिराबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आपण आजपर्यंत राम मंदिरात गेलेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप धार्मिक मुद्द्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आझाद यांनी सांगितले की, आपण कामाख्या देवी आणि त्रिपुरा सुंदरी मंदिरात जातो. मग कामाख्या देवीची पूजा करणारी व्यक्ती हिंदू नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राम मंदिरात जाण्याऐवजी आपण मथुरेला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजप मंदिर आणि धार्मिक भावनांचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली.

यावेळी आझाद यांनी माता सीतेच्या अग्निपरीक्षेचा आणि त्यानंतर झालेल्या त्यागाचा उल्लेख केला. आपण माता सीतेच्या जन्मभूमीचा असल्याचे सांगत त्यांनी, अग्निपरीक्षा देऊनही सीतेचा त्याग करण्यात आला, हे योग्य होते का, असा प्रश्न उपस्थित केला. पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणे आणि ती परीक्षा पार केल्यानंतरही तिचा त्याग करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव १२ डिसेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमानगढी येथे दर्शनासाठी जाणार आहेत. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्यावर भाजपने टीका केली आहे. हा दौरा निवडणुकीतील राजकीय फायदा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कीर्ती आझाद यांनी भाजपच्या धार्मिक राजकारणावर प्रश्न उपस्थित केले.

भाजपने देशात रामराज्याऐवजी रावणराज्य आणल्याचा आरोपही आझाद यांनी केला. राम मंदिराशिवाय जनहिताच्या मुद्द्यांवर भाजपकडे बोलण्यासारखे काही उरलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!