अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती कारंजा चौकात दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेला दहा फुटी भव्य आकाशकंदील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आकर्षक रचना आणि रंगसंगतीने लक्ष वेधणाऱ्या या आकाशकंदिलातून सामाजिक जनजागृतीसोबतच राजकीय चर्चेलाही नवा विषय मिळाला आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असे संदेश देत जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदिलावर सोलापूर जिल्ह्याच्या नकाशासोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. दोन्ही नेत्यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदी पाहण्याच्या चर्चेला मित्र परिवाराने या प्रतीकात्मक मांडणीतून अधोरेखित केल्याचे बोलले जात आहे.
दिवाळीच्या रोषणाईला सामाजिक जाणीवेची जोड देतानाच राजकीय घडामोडींचे संकेत देण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे. सध्या पाणीटंचाई, पर्यावरणाचा ऱ्हास आणि मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न महत्त्वाचे असताना सणाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत हे संदेश पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. दुसरीकडे, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत संचालकपदासाठी कल्याणशेट्टी यांच्या नावांची चर्चा सुरू असताना जिल्ह्याच्या नकाशावर झळकलेली त्यांची छायाचित्रे राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेत आहेत. .
मिलन कल्याणशेट्टी मित्र
परिवाराच्यावतीने उभारण्यात आलेल्या या भव्य आकाशकंदिलाच्या निर्मितीसाठी प्रदीप पाटील, अभिषेक लोकापुरे, शरण कापसे, सिद्धाराम टाके, जगदीश हळगोदे, चेतन कल्याणशेट्टी, विनू डिघे, बप्पा उंबराणीकर, बबलू भागानगरे, प्रथमेश जोजन आणि वरद धरणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कारंजा चौकातील हा दहा फुटी आकाशकंदील केवळ दिवाळीची शोभा वाढविणारा देखावा न राहता सामाजिक संदेश देणारा आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला चालना देणारा ठरत आहे.









