अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन गुरु परंपरेचा आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या यज्ञनगर शिवपुरी येथे विश्व उत्सव २०२६ अंतर्गत दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात वैदिक परंपरेनुसार दीपावली साजरी करण्यासह गुरुचरणी नतमस्तक होण्याची आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री बाळप्पा महाराज, श्री गंगाधर महाराज, परम सद्गुरू श्री गजानन महाराज आणि परम सद्गुरू श्री श्रीकांतजी महाराज यांच्या गुरु परंपरेचे अधिष्ठान लाभलेल्या या परिसरात श्रद्धा, साधना आणि सेवाभावाचा संगम
अनुभवायला मिळत आहे.
परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी पुनरुज्जीवित केलेल्या अग्निहोत्र परंपरेचा संदेश पुढे नेणाऱ्या शिवपुरीत वैदिक मंत्रघोष, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र, गोपूजन, पारंपरिक पूजन आणि दीपप्रज्वलन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दीपावलीच्या मंगल मुहूर्तावर विशेष पूजन व दर्शनाचा लाभही भाविकांना घेता येईल. यासोबतच पारंपरिक गोवर्धन पूजन आणि अन्नकूट सोहळा साजरा केला जाणार असून, नव्या पिढीला गोसेवा, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि अन्नाचा आदर यांची शिकवण देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
विश्व परिवाराच्या विविध सेवाभावी उपक्रमांतून ५ हजारांहून अधिक कुटुंबांना सहकार्य व आधार दिला जात आहे. या सामाजिक बांधिलकीला विश्व उत्सवाच्या माध्यमातूनही बळ देण्यात येत आहे. उत्सवात सहभागी होणे, विश्व लाइफस्टाइल स्टोअरमधून खरेदी करणे आणि संस्थेच्या उपक्रमांशी जोडले जाणे, यातून या सेवाकार्याला हातभार लावता येणार आहे. अभ्यागतांसाठी भारतीय खाद्यपदार्थांचा फूड कार्निव्हल, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडक उत्पादनांवरील उत्सवी सवलती, मेहंदी, रांगोळी तसेच मुलांसाठी विविध सर्जनशील उपक्रमांचीही मेजवानी असणार आहे. त्यामुळे हा दीपोत्सव आध्यात्मिक आनंदासोबतच संपूर्ण कुटुंबासाठी स्नेहमेळाव्याचे आकर्षण ठरणार आहे.
श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरु मंदिर आणि विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुपीठाशी जोडलेले भक्त, अग्निहोत्र साधक, स्थानिक नागरिक तसेच प्रथमच शिवपुरीला भेट देणाऱ्या भाविकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दैनंदिन धावपळीतून वेळ काढून वैदिक आश्रमाच्या पवित्र वातावरणात दीपावलीचा आनंद घ्यावा आणि गुरु परंपरेच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे.









