कोल्हापूर, वृत्तसंस्था : गोकुळ दूध संघावर शासकीय संचालक नियुक्त करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात राजू शेट्टी, विश्वजीत कदम, विशाल पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आणि जयंत पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी सतेज पाटील यांनी सरकारकडून नियुक्त होणाऱ्या चार शासकीय संचालकांची नावे जाहीर करत सरकारवर जोरदार टीका केली.
महायुती सरकारने गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्त करण्यासाठी अध्यादेश काढला आहे. त्यापैकी चार संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या निर्णयाला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. सतेज पाटील यांनी शिवाजी आडनाईक (पन्हाळा), डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील (कागल) आणि अॅड. प्रशांत पाटोळे (सांगली) या चौघांची नावे जाहीर केली. काही अधिकारी अजूनही आपल्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून ही माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. सांगलीतील व्यक्तीची गोकुळवर नियुक्ती करण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सहकाराची पायाभरणी केलेल्या भूमीत आज सहकार पायदळी तुडवला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. “मला कुणी सोडून गेले म्हणून मी घाबरणारा नाही. मी मैदानात लढणारा पाटील आहे,” असे सांगत त्यांनी संघर्षाची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात दहा आमदार, दोन खासदार आणि मंत्र्यांची फौज असतानाही कोल्हापूरच्या जनतेने आपल्या बाजूने कौल दिल्याचे ते म्हणाले.
गोकुळच्या निवडणुकीत आपण साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तर हसन मुश्रीफ हे आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीच्या निकालानंतर मुश्रीफ यांनी आपल्या मुलाच्या पराभवाचा वारंवार उल्लेख केला; मात्र मातंग समाजातील सुजीत मिणचेकर आणि मराठा समाजातील युवराज पाटील यांच्या पराभवाबाबत त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, असा सवाल उपस्थित करत सतेज पाटील यांनी सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधला.








