कोल्हापूर, वृत्तसंस्था : गोकुळ दूध संघावर शासकीय संचालक नियुक्त करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या विवेकानंद पाटील यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली. तसेच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आगामी काळात विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
गोकुळवर शासकीय संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सहकारी संस्थांमधील लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात विवेकानंद पाटीलही सहभागी झाले होते. यापूर्वी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एमपीएससी आंदोलनात भाषण करून चर्चेत आलेल्या विवेकानंद पाटील यांनी या मोर्चातही आक्रमक भूमिका मांडली.
भाषणादरम्यान त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत त्यांना खुले आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.
यावेळी त्यांनी अमूलच्या चॉकलेटचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “काल मी एका नेत्याचा फोटो पाहिला. हा नेता अमूल कंपनीचे चॉकलेट देत होता. या नेत्याला गोकुळचे चॉकलेट सापडले नाही का? नुसते अमूल-अमूल करत आहेत,” असे म्हणत त्यांनी गोकुळच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले.










