---Advertisement---

बंटी पाटील मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात’; चंद्रकांत पाटलांचा टोला

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर, वृत्तसंस्था : गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडत आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार शासकीय संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने सतेज पाटील यांच्या पॅनेलने आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकालापूर्वीच महायुतीने आपला अध्यक्ष झाल्याचा दावा करत सभा घेतली. या सभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. महायुती एकत्र आहे; मात्र महाविकास आघाडीत सतेज पाटील यांच्यामागे ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसही उभी राहिली नाही, असा दावा त्यांनी केला. “जाईल तिथे सर्वांना पायाखाली घेणे आणि स्वतःची टिमकी वाजवणे, हे त्यांचे काम आहे. कारण कधीतरी मला मुख्यमंत्री व्हायचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

सतेज पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यासाठी त्या प्रकारची समजही असायला हवी, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. “या १५ दिवसांत मला समजले की ते बंटीच आहेत. बंटीचा बंटी साहेब झालाच नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याबाबतच्या भूमिकेवरूनही विरोधकांना सुनावले. “तुम्ही कराल ते योग्य आणि मुश्रीफ साहेब करतील तर अयोग्य, हे आता चालणार नाही. ही दादागिरी चालणार नाही. आपली उंची पाहून काम करा,” असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास विरोधकांचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असे विधान करत त्यांनी सतेज पाटील यांना इशारा दिला. यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनमध्ये जाण्याचे धाडस दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!