मुंबई, वृत्तसंस्था : छटपूजेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोन्ही नेते रसातळाला गेलेले राजकारण करत असून, कधी कुंभमेळा तर कधी छटपूजेला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होणारी छटपूजा निर्विवादपणे पार पडेल, असा दावाही सदावर्ते यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांनी त्यांना बालकांची उपमा दिली. हे बालक आहेत, यांना बालकच म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही नेत्यांना लक्ष्य केले. छटपूजेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
दरम्यान, सदावर्ते यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांना थेट आव्हान दिले आहे. १५ नोव्हेंबर रोजी ज्या ठिकाणी छटपूजा सुरू असेल, त्या ठिकाणी येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. मुंबईत छटपूजा होणारच असून, राज ठाकरे यांच्या दोन-पाच कार्यकर्त्यांमुळे पूजा थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
छटपूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील आणि विरोध करणारे तेथून पळून जातील, असा दावाही सदावर्ते यांनी केला. त्यामुळे आगामी १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छटपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.









