ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये ग्रा.पं निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅटर्नकडे लक्ष ! स्थानिक गटांमध्ये होणार चुरशीची लढाई

 

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात सध्या
७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत.या निवडणुका स्थानिक पातळीवर होताना पाहायला मिळत आहेत.यात अनेक ठिकाणी परंपरागत गट आणि काँग्रेस,भाजप आमने सामने येत आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका देखील महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढवा,अशा प्रकारची घोषणा केल्याने या पॅटर्नचा प्रभाव या निवडणुकावर कितपत पडणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.दोन दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा
निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे.तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य असताना महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यास काँग्रेस सहमत होणार का आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या लोकांना ग्रामपंचायतमध्ये संधी देणार का,
हा मोठा प्रश्‍न आहे.आजपर्यंत गावपातळीवर भाजप आणि काँग्रेस या दोन गटातच निवडणूका होत होत्या.यंदा मात्र तालुक्यात हे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.सध्या तालुक्‍यात गावोगावी ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.पॅनेल तयार करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी सध्या गावपातळीवरील नेते व
कार्यकर्ते पुढे येत आहेत.तालुकास्तरीय नेते ग्रामपंचायत निवडणुकीत फारसे लक्ष घालत
नसतात.गावपातळीवरील स्थानिक कार्यकर्त्या मध्येच निवडणुका होत असतात .यामुळे शक्यतो गावपातळीवरील निवडणूकीत राजकीय रंग चढताना दिसून येत नाही.यावेळी मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येऊन ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाच्या नेत्यामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अक्कलकोट हा भाजप व काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने आज पर्यंत तालुक्यात दोन
गटातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चुरशीच्या होताना दिसून आल्या आहेत. परंतु यंदाचे महाविकास आघाडीचे समीकरण पहाता तालुक्यात महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी होणार का,हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.म्हणून भाजप व महाविकास आघाडी करीता ही प्रतिष्ठेची लढाई असल्याचे बोलले जात आहे.कारण विद्यमान आमदार व खासदार हे भाजप पक्षाचे असल्याने या लढाईत त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.तर इकडे महाविकास आघाडीला शिक्षक
व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे.यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या रणांगणात कोण मारणार बाजी ? आणि कोण बॅकफूटवर जाणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उमेदवार माघारनंतर
पुढचे चित्र स्पष्ट होणार

अक्कलकोट तालुक्यात
सगळ्यात मोठा टप्पा ग्रामपंचायत निवडणुकीचा हा आहे.आता या टप्प्यामध्ये किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात आणि किती ठिकाणी निवडणुका लागतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.निवडणूक लागलेल्या गावात महाविकासआघाडीचा पॅटर्न कितपत लागू पडतो हे देखील निकालानंतरच कळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!