---Advertisement---

सोलापुरात रंगणार चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा !

By team
On: March 3, 2026 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. ४२ जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून अधिक महिला कुस्तीपटू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) अशा विविध वजनी गटांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी गौरविण्यात येणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला मल्लास मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला संस्थेच्या संचालिका व संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके आदी उपस्थित होते.

तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे यंदाही प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. तिने यापूर्वी स्पेन येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच थायलंडमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. गतवर्षीच्या अंतिम लढतीत भाग्यश्रीने अमृता पुजारीवर मात करत किताब पटकावला होता.यंदा तिच्यासमोर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले आणि वेदांतिका पवार यांचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदाची अंतिम लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धाही राज्याच्या क्रीडाक्षेत्रात आपली ठसा उमटवत आहे. “वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आम्ही या उपक्रमाच्या पाठीशी आहोत आणि मी स्वतः या स्पर्धेला उपस्थित राहणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात कुस्तीचे मोठे परंपरागत वारस आहे; मात्र दर्जेदार सुविधा, आखाडे व व्यासपीठाच्या अभावामुळे अनेक खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित संधी मिळत नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत महिला कुस्तीपटूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘निर्झरा’तर्फे केला जात आहे.स्वाती यांच्या वडिलांचे, ज्येष्ठ कुस्तीपटू व पोलिस अधिकारी सिद्धाराम साखरे यांचे स्मरण ठेवत २०२३ मध्ये निर्झरा केअर फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली. त्यांच्या क्रीडा वारशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव संजय शेटे, राष्ट्रीय चॅम्पियन संदीपआप्पा भोंडवे, विलास कथुरे, हनुमंत गावडे, मेघराज कटके, तात्यासाहेब भिंताडे, दिनेश गुंड, संजय तिरथकर, उद्योगपती सागर कत्ते, वस्ताद भरत मेकाले यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. महिला कुस्तीला चालना देणारी ही स्पर्धा राज्यातील क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून, महाराष्ट्र केसरी किताबासाठी होणाऱ्या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!