अक्कलकोटमध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळेना ! रिपाईने दिला आंदोलनाचा इशारा
अक्कलकोट,दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० साली मंजूर झालेल्या ११९ लाभार्थी यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी वितरीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पदभार घेतलेल्या आशा राऊत यांनीही आश्वासन देऊन अनुदान दिले नाही. त्यानंतर प्रभारी म्हणून आलेले के. अंकीत यांनीही अनुदानाची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये अक्कलकोट नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आजतागायत कोणत्याही प्रकारची अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली नाही. एकंदरीत पाहता अक्कलकोट नगरपरिषदेमध्ये ‘आंधळ दळतयं कुञं पिठ खातयं’ या म्हणीप्रमाणे कारभार चालू आहे. तरी या भोंगळ कारभारामुळे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी मुख्याधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा झाली पण पालथ्या घड्यावर पाणी याप्रमाणे कारभार चालू आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अधिकारी वर्ग विनाकारण टाळाटाळ करत असतील तर येत्या आठ दिवसात संबंधित योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा न झाल्यास पुढील आठवडय़ात उग्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे.यावेळी नगरसेवक आलम कोरुबू नगरसेवक कांतु धनशेट्टी,रिपाइं शहर अध्यक्ष प्रसाद माने,रवि सलगरे, प्रकाश माने,शुभम मडिखांबे,संतोष माने,प्रा सुनील थंब,पाटोळे उपस्थित होते