ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी ७५.८६ टक्के मतदान; खैराटमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू, सोमवारी होणार मतमोजणी

 

अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी झालेल्या ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७५.८६ टक्के शांततेत मतदान झाले. खैराट येथे प्रभाग क्रमांक ३ मधील एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्या जागेची निवडणूक प्रशासनाने थांबवली मात्र उर्वरित जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत एकूण १ लाख १३ हजार ३२८ मतदारांपैकी ८५ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये ५३ हजार ९०१ स्त्री मतदारांपैकी ४० हजार ३३१ तर ५९ हजार ४२० पुरुष मतदारांपैकी ४५ हजार ६४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.परंतु तुलनेने दुपारपेक्षा सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली. दुपारी दीड पर्यंत ५२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला गती येऊन ही टक्केवारी ७५ टक्केपर्यंत पोचली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या अतिशय चुरशीच्या होत असतात.या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला महत्त्व असते.प्रत्येक मतदारापर्यंत पॅनल प्रमुख हा पोहोचत असतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी यावेळी वाढल्याचे बोलले जात आहे.खैराट ग्रामपंचायतीमध्ये सायबणा बिराजदार या ५८ वर्षीय उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला.त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी मतदान थांबवले गेले. नंतर पुन्हा त्या जागेचे मतदान सोडून उर्वरित जागेसाठी मतदान सुरळीत
पार पडले.तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या.त्यापैकी नऊ गावे यापूर्वी बिनविरोध
झाली आहेत. एका गावात हंजगीमध्ये फेरनिवडणूक लागणार आहे.तर उर्वरित ६२ ग्रामपंचायतीसाठी आज सायंकाळी साडेपाच पर्यंत अतिशय चुरशीने मतदान
पार पडले.कुठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्तासाठी प्रचंड पोलिसांचा फौजफाटा होता.तालुक्यातील हन्नूर, जेऊर, वागदरी, कुरनूर, चपळगाव यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चुरशीने पण शांततेत मतदान पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.या गावाच्या निवडणुकीत आता काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

९८० उमेदवारांचे
भवितव्य मतपेटीत बंद

७२ गावांसाठी एकूण ६३४ जागा होत्या त्यापैकी ९ गावे बिनविरोध झाली आहेत त्यामुळे उर्वरित ४४७ जागांसाठी ९८० उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.सोमवारी याची मतमोजणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!