मुंबई, दि. २८:- अध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारवाणीचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांच्या निधनामुळे हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, हाडाचे शिक्षक असलेल्या ह.भ.प. उत्पात यांनी अध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय राहतानाच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक कामाचे योगदान दिले आहे. पंढरपूरच्या विकासात त्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमांची जोड दिली. परखड वक्ते, प्रभावी प्रवचनकार आणि प्रखर राष्ट्राभिमानी म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. पंढरपूरचे नगराध्यक्ष, विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. लेखन, संगीत आणि लोककलांचा अभ्यास असा त्यांचा व्यासंग होता.अशा विविध क्षेत्रात अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे अशी ह.भ.प. उत्पात यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले आहे. भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांना भावपूर्ण श्रद्धांजली.