नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना व्हायरसनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. इन्कम टॅक्स स्लॅब हा जसा सर्वसामान्य लोकांच्या उत्सुकतेचा विषय असतो तसेच सोने आणि चांदी याबाबत अर्थसंकल्पात काय घोषणा होते याकडे लोकांचे लक्ष असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सोनं-ंचांदी स्वस्त होणार असून सीतारामन यांच्या या घोषणेचा परिणाम तात्काळ सराफा बाजारात पाहायलाही मिळाला आहे.
सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची सांगता होताच सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात मोठी घट झाली असून सोन्याचे भाव तब्बल १२०० रुपयांनी पडले आहेत.
दरम्यान, आजच्या अर्थसंकलीय भाषणामध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी सोन्या-चांदीवरील आयात शुल्क २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज दुपारी १ वाजता सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण झाल्याने आता सोन्याचा भाव प्रति १० ग्रामसाठी ४८,१२३ इतका कमी झाला आहे. असं असलं तरी चांदीच्या दारात मात्र आज वाढ झाली आहे. आजच्या वाढीमुळे प्रति किलोग्रॅम चांदी ७२,८७० रुपयांवर जाऊन पोहचली आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. सकाळी ९.०५ मिनिटांनी १८५ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये इतका होता. तर चांदीचा दरही १९४४ रुपयांच्या वाढीसह ७१,६५० रुपये इतका नोंदविण्यात आला होता.