सोलापूर,दि.१५ : – आयुष्यात मोठे होण्यासाठी नम्रता असणे फार महत्वाचे आहे.नम्रतेमुळेच शरद पवार जागतिक कीर्तीचे नेते बनले असे प्रतिपादन ह.भ.प.निवृत्ती महाराज-इंदुरीकर यांनी केले.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी महिला उद्योग समूह व बचत गटाच्यावतीने सोमवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्यात ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बोलत होते. उद्योग समूहाच्या संस्थापिका मंगला कोल्हे आणि दिलीप कोल्हे यांनी या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते .
प्रारंभी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, कर्जत – जामखेडचे उद्योगपती रमेश गुगळे यांच्या हस्ते श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या निमित्ताने अनगर येथील शिवपार्वती महिला बचत गट,बुधवार पेठेतील महालक्ष्मी बचत गट,नीलम नगरातील अनिकेत बचत गट,शेळगी येथील संतोषीमाता आणि स्वागत नगर येथील साईलीला या महिला बचत गटांचा सन्मान सोहळासुद्धा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले,जगातील सर्वात श्रीमंत घर हे संतांचे आहे.आज सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले आहे.मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.परिणामी मनोरुग्ण संख्या वाढत आहे.कमी कस्टl त लक्ष्मी मिळविण्याचे प्रयत्न लोक करत आहेत.मनासारखी गोष्ट घडत नसल्याने लोकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे.मोबाईलमुळे तर आणखीनच मानसिक खच्चीकरण होत आहे.त्यामुळे तणाव घालवायचा असेल तर भरपूर हसा आणि भजनात रमा असा सल्ला यावेळी दिला.
हसणे ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.नेहमी सकारात्मक रहा. चांगले करता येत नसेल तर वाईटसुद्धा करू नका असे सांगत कोरोनाचा घालवायचे असेल तर मास्क वापरा आणि हात स्वच्छ धुवा असे इंदुरीकर महाराजांनी यावेळी बोलताना सांगितले.
शरदचंद्र पवार यांनी आयुष्यात प्रामाणिकपणे कष्ट घेतले आहेत.त्यांचा आदर्श सर्वांनी आपल्या जीवनात घेतला पाहिजे. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शरदचंद्र पवार यांचे नाव राहील अशा शब्दात महाराजांनी पवारांच्या कार्याचा गौरव केला.महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरातील धार्मिक व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिलीप कोल्हे आणि मंगलाताई कोल्हे यांच्यामुळे बचत गटातील हजारो महिलांना हाताला काम मिळाल्याबद्धल महाराजांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास ह.भ.प. सुधाकर इंगळे-महाराज,माजी महापौर मनोहरपंत सपाटे,जनार्दन कारमपुरी,माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, नगरसेवक चेतन नरोटे,अमोल शिंदे,विनोद भोसले,नागेश गायकवाड, गटनेते किसन जाधव,सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सुनील रसाळे,दिलीप सिद्धे, राजन जाधव,अक्षय बचुटे, नवनाथ भजनावळे,राहुल काटे,अल्ताफ बुऱ्हाण,उमाकांत निकम,ज्योतीराम चांगभले यांच्यासह लता फुटाणे,लता ढेरे, वैशाली गुंड,सुनंदा साळुंखे,जयश्री पवार,नसीम शेतसंदी, सत्यभामा खाडे, स्वाती पवार,जनाबाई निकम,अश्विनी भोसले आदी उपस्थित होते .