मुंबई : मागील आठवड्यापासून सुरु झालेलं इंधन दरवाढीचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. आज सोमवारी सलग सहाव्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली आहे. रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका आणि इतर काही देशांच्या अंतर्गत अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.