ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा – ठाकरे

 

मुंबई दि. १७ – संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबवायला हवे. या करिता उद्योग विभागाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

आज वर्षा निवासस्थानी झालेल्या ईज ऑफ डुईंग बिजनेस आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव गोपाल रेड्डी, प्रधान सचिव विकास आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, देशात महाराष्ट्र सर्वात जास्त परकीय गुंतवणूक मिळविणारे राज्य आहे. गुंतवणूकीचा हा ओघ असाच वाढता राहायला हवा. राज्याच्या भरभराटीसाठी अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित गुंतवणूक यायला हवी, त्याकरिता ईज ऑफ डुईंग अधिक प्रभावी करायला हवे. उद्योग विभागाने यासाठी ईज ऑफ डुईंग बिजनेस प्रक्रिया अधिक सक्षम करावी. त्या करिता आवश्यक पाऊले उचलावित, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अशा प्रयत्नामुळेच भविष्यात उद्योग क्षेत्रातील आपल्या राज्याची कामगिरी इतरांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी उद्योग विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!