ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्या संवेदनशील मार्गावर एसटीची वाहतूक करू नये ; प्रशासनाचे सर्व एसटीच्या आगारांना निर्देश

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.

एसटी च्या स्थानिक प्रशासनानं तशी माहिती घेऊन त्या- त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश आहेत. ज्या रस्तावर, मार्गावर आंदोलन होत आहे अथवा होणार आहे अशा मार्गावर वाहतूक करू नये, असे निर्देश आहेत.

दरम्यान, उद्याच्या शेतकऱ्यांच्या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून, त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूर मधील बाजार समित्याही उद्याच्या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!