सोलापूर : महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पांडे यांनी काळे याच्याविरूध्द 21 डिसेंबर रोजी शिवीगाळ करून खंडणी मागितल्याची फिर्याद दिली होती. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर काळे हा फरार होता. त्याच्या अटकेसाठी शहर गुन्हे शाखेची दोन पथके नियुक्त केली होती.
सातारा, पुणे, परभणी व लातूर या 4 जिल्ह्यांमध्ये उपमहापौर काळे याने वास्तव्य केले होते. मंगळवारी काळे हा टेंभुर्णीकडून सोलापूरमार्गे लातूरकडे जाणार असल्याची खबर शहर गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने जुना पूना नाका व जुना तुळजापूर नाका येथे सापळा लावला होता. एमएच 13 सीके 9236 या क्रमांकाच्या स्कार्पिओमधून काळे हा रूपाभवानी मंदिराजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षक अश्विभनी भोसले यांनी बुधवारी उपमहापौर राजेश काळे याला न्यालयासमोर हजर केले. न्यायाधीशांनी काळे यास 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण ?
उपमहापौर काळे पदाचा गैरवापर करून पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या अखत्यारित असलेली आरोग्य विभागातील कामे नियमबाह्य पद्धतीने करण्यासाठी दबावतंत्रांचा वापर करीत होते. टक्केवारी दिल्याशिवाय कामाची बिले मक्तेदाराला अदा केल्यास बघून घेण्याची धमकी वारंवार देत होता. त्याने उपायुक्त पांडे यांच्या नियुक्तीलाच हरकत घेतली होती. तुमची बदली थांबवायची असेल तर 5 लाख द्या, नाहीतर तुमच्यावर अॅ्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही दिली होती.
शासकीय कामात हस्तक्षेप करून धमकी देण्याचा प्रयत्न काळे हे वारंवार करीत होते. काळे याने धनराज पांडे यांना अर्वाच्च भाषेेत शिवीगाळ केल्याचा ऑडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.