मुंबई – औरंगाबादचे नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीमधील नेते आमनेसामने आले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असून कॉग्रेस मात्र विरोधात आहे. अशातच औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा खरमरीत सवाल शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होईल”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नाव बदलण्यास विरोध असल्याचे विधान कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आणि ते प्रथमच वादात सापडले. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. “औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे,’ अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.