---Advertisement---

राज्यसभा रणधुमाळी; पवारांच्या उमेदवारीवर संभ्रम, महायुतीचा ‘पाचव्या’चा डाव? !

By team
On: March 4, 2026 11:10 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही अनेक पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेषतः Sharad Pawar यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे विरोधी आघाडीत संभ्रमाचे वातावरण असून सत्ताधारी महायुतीनेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार सहा जागा महायुतीकडे, तर एक जागा महाविकास आघाडीकडे जाण्याचे चित्र आहे. महायुतीत भाजपला चार जागा, शिवसेना  शिंदे गटला एक आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीला एक जागा अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजप आणि शिंदे गटाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विरोधी आघाडीत एकमेव जागेसाठी तीन पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉँग्रेस   आणि राष्ट्रवादी शरद पवार गट  या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पुढे करून आपली बाजू भक्कम केली जात आहे. तर ठाकरे गटाची शिवसेना संख्याबळाचा आधार घेत दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जर शरद पवारांना उमेदवारी मिळाली नाही, तर भाजप पाचवा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार करू शकतो. अशा परिस्थितीत निवडणुकीत अनपेक्षित चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती विरोधकांच्या अंतिम निर्णयावर लक्ष ठेवून रणनीती आखत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे. राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर मानले जात असले तरी ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम आणि गजानन किर्तीकर यांची नावेही चर्चेत आहेत. शिंदे आज वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

येत्या १६ तारखेला देशभरातील ३७ जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांव्यतिरिक्त तामिळनाडू (६), बिहार व पश्चिम बंगाल (प्रत्येकी ५), ओडिशा (४), आसाम (३), तेलंगणा (२) तर छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश (प्रत्येकी १) अशा जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा परिणाम राष्ट्रीय पातळीवरही उमटण्याची शक्यता आहे. अर्जाच्या अंतिम मुदतीपूर्वी कोणता पक्ष कोणती चाल खेळतो, यावरच या निवडणुकीची रंगत अवलंबून राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!