मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा सध्या गाजत असून प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत आहे.या दरम्यान, रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी देखील या प्रश्नी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
औरंगाबादचे नामांतरवरुन राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. काँग्रेससह आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतरणाला विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे भाजपा आणि मनसेनंही संभाजीनगर नाव करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. आता, राष्ट्रवादी यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर करताना नामांतराला विरोध केला आहे. ‘शहराचं नाव बदलून विकास होत नाही. काँग्रेसचा भर लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आहे. औरंगाबादच्या नामांतराचा विषय अद्याप चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल तेव्हा काँग्रेस भूमिका मांडेल. नाव बदलण्यास आमचा ठाम विरोध आहे’, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं होतं. त्यामुळं नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. ही संधी साधून विरोधी पक्ष भाजपनं ही मागणी रेटून धरली आहे. तसंच, शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे