मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर 9 सप्टेंबरला महापालिकेचा हातोडा पडला होता.
मुंबई महानगरपालिकेची ही कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कंगनाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हायकोर्टाने मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसानभरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला आणि दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारली. तसंच कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले. देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले, असल्याचा ठपका पालिकेनं ठेवला होता. त्याचबरोबर, तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन, ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारण्यात आल्याचा दावाही पालिकेनं केला होता.