अक्कलकोट,दि.२० : संपूर्ण तालुक्याचे
लक्ष लागून राहिलेल्या लक्षवेधी कुरनूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा नेते व्यंकट मोरे यांच्या पॅनेलने अकरा पैकी
आठ जागा जिंकून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले.या निवडणुकीत चार पॅनल उभे होते.ही लढत चौरंगी होती.तरीही मोरे गटाने बाजी मारली.
विरोधी पॅनलमध्ये माजी सरपंच अमर पाटील,बाबासाहेब पाटील व पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे तसेच राहुल काळे यांच्या पॅनेलचा समावेश होता.यात फक्त पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या.उर्वरित पाटील आणि काळे गटाला एकही जागा मिळाली नाही.त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार पराभूत झाले.प्रभाग चार मध्ये स्वतः व्यंकट मोरे यांनी माजी सरपंच अमर पाटील यांचा पराभव केला तर वार्ड एकमध्ये माजी उपसभापती स्वामीराव पाटील यांचे चिरंजीव बाबासाहेब पाटील यांचा विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे यांनी पराभव केला.अमर पाटील गटाकडून उभारलेल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शोभा काळे यांचाही प्रभाग दोन मध्ये रेश्मा शिंदे यांनी पराभव केला.बाळासाहेब मोरे यांचे चिरंजीव चेतन मोरे हे प्रभाग दोनमध्ये पहिल्यांदा निवडून आले.दोनचे सर्व उमेदवार हे बाळासाहेब मोरे गटाचे निवडून आले.इतर सर्व प्रभागांमध्ये व्यंकट मोरे यांच्या पॅनेलने वर्चस्व मिळवले.सलग दुसऱ्यांदा मोरे गटाने विजय मिळवून ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवला आहे.या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे,लक्ष्मी शिंगटे,रुकसाना मुजावर,प्रभाग २ मध्ये चेतन मोरे,रेश्मा शिंदे,रमेश पोतदार ,प्रभाग ३ मध्ये राजु गवळी,नौशाद तांबोळी, प्रभाग ४ मध्ये व्यंकट मोरे,सुनंदा शिंदे,अलका सुरवसे हे अकरा उमेदवार विजयी झाले.