अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.बंधाऱ्याची किरकोळ करून पुढच्या आठवड्यात पाणी सोडण्यात येईल,अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.या बैठकीत संपूर्ण उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी अतिपावसामुळे कुरनूर धरण तुडुंब भरले. आजच्या घडीला धरणांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात म्हणजे १५ अथवा १६ फेब्रुवारीला धरणातून रब्बी पिकासाठी
पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.त्या माध्यमातून धरणाखाली असणारे आठ कोल्हापुरी बंधारे भरून घेतले जाणार आहेत,अशी माहिती आमदार कल्याणशेट्टी यांनी दिली.साधारण धरणातून २० ते २२ टक्के पाणी खाली सोडण्यात येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे नियोजन करण्यात
येत असते.त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.यात दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या तिन्ही नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून यासंदर्भात नियोजन केले गेले आहे. यावर्षी पाणी अजूनही नव्वद टक्क्याच्या पुढे आहे.त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याच्या दृष्टीने चांगला राहील, असे सांगण्यात आले.गेल्यावर्षी अनेक बंधाऱ्यातून प्रचंड पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्ती काही प्रमाणात झालेली आहे.त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता थोडी कमी आहे.या निर्णयामुळे मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुददेवाडी, बबलाद, सांगवी, बणजगोळ, सिंदखेड हे सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्याचा फायदा हा नदीकाठच्या गावांना व रब्बी पिकांना होणार आहे,असे सांगण्यात आले.या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे,भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह इतर अधिकारी आणि सल्लागार समितीचे
सदस्य व नदीकाठचे शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.