अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर धरण परिसरात पहिल्यांदाच शाही ससाणा पक्षी आढळला आहे.त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि पर्यटकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चालले आहे.धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्षी येत आहेत.
कुरनूर धरणाचा परिसर, झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर यामुळे देश विदेशातील पक्ष्यांना आकर्षित करत आहेत. चपळगावातील वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ, सचिन पाटील सर, रत्नाकर हिरेमठ आणि नीलकंठ पाटील यांनी कुरनुर धरण परिसरात विविध पक्ष्यांच्या नोंदी केलेल्या आहेत.त्यातून हे स्पष्ट झाले आहे.वन्यजीव छायाचित्रकार सचिन पाटील यांनी पहिल्यांदा या परिसरात शाही ससाणा पक्ष्याची नोंद व छायाचित्रण केले आहे. शिवानंद हिरेमठ यांच्या सतरा वर्षांच्या
कुरनूर परिसरातील पक्षी निरीक्षणामध्ये पहिल्यांदाच हा पक्षी आढळल्याचे त्यांनी सांगितले.शाही ससाणा याला इंग्रजीत Shaheen Falcon हा नाव आहे. हा भारतीय उपखंडात आढळणारा रहिवासी पक्षी आहे.
काळी पाठ , फिकट तपकिरी रंगाची छाती, पांढरा गळा व तसेच छातीवर गडद रेषा ही त्याची ओळख.नर आणि मादी एकसारखेच दिसतात. नर हा आकारामध्ये कावळ्याएवढा असतो तर मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. हा मुख्यतः खडकाळ आणि डोंगराळ भागात आढळतो.
शाही ससाणा साधारणतः एक किंवा जोडी मध्ये दिसतात, ह्यांची आयुष्यभर एकच जोडी असते.हा पक्षी हवेतल्या हवेत त्याच्या भक्ष्याला पकडण्यासाठी ओळखला जातो.हवेत उडत असताना याचा वेग ताशी २४० किलोमीटर पर्यंत असू शकतो
हवेतून याच्या भक्ष्याकडे सूर मारताना ह्याचा वेग ताशी ३२० किलोमीटर पर्यंत असू शकतो.
हा मुख्यतः लहान व मध्यम आकाराचे पक्षी जसे की पोपट ,कबुतर यांची शिकार करतो. शाही ससाणाच्या वेगामुळे भक्ष्याची सुटण्याची शक्यता फार कमी असते.ही वर्षातून ३ ते ४ अंडी घालतात.
भारतात अनेक वेळा यांची घरटी मोबाईल टॉवर, बिल्डिंग अशा मानव निर्मित ठिकाणी दिसतात. धरणाच्या परिसरात शाही ससाणा दिसल्याने वन्यजीव प्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पर्यटन केंद्र म्हणून
विकसित करावे
कुरनूर धरण हा परिसर मागच्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी आणि पक्षीनिरीक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे.शासनाने याकडे लक्ष देऊन हा परिसर पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यामुळे या परिसराचा विकास होऊ शकेल.
शिवानंद हिरेमठ,पक्षी निरीक्षक