अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरले आहे.त्यामुळे तालुकावासियांच्या धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरून वाहू लागल्याने कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मागच्या चार-पाच चार दिवसात हरणा नदीतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे तसेच मागच्या दोन दिवसापूर्वी तुळजापूर आणि नळदुर्ग परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बोरी नदीद्वारे काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दरवर्षी धरण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरत असते. यावर्षीदेखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील जीवनमान हे पूर्णपणे कुरनूर धरणावर अवलंबून आहे त्यामुळे धरण भरण्याची अशा सर्वांनाच लागली आहे खासकरून बोरी नदीकाठच्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतो. धरण भरल्यानंतर वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटतो. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत धरणांमध्ये ४०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.हरणा नदीच्या पात्रातून अद्यापही विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.