कोल्हापूर । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत आंदोलनात दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत असल्याचे सांगितलं आहे.
सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितलंय. गेल्या जून महिन्यांपासून आम्ही सातत्याने या तिन्ही कृषी कायद्याला विरोध करत आहोत, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच आम्ही करत नाहीत, असे म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची अपेक्षा नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. याशिवाय विरोधी पक्षांचा आंदोलनातील सहभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याने आपण नाराज असल्याचंही शेट्टी म्हणाले.
देशभरातून शेतकरी मोठ्या संख्येने व ताकदीने आंदोलनात सहभागी होत आहे, पण विरोधी पक्ष प्रभावीपणे दिसत नाही. स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव देण्याची, ऊसाला एफआरपी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण, सरकार याकडे लक्ष देत नसून कुणीही मागणी न केलेले कायदे अस्तित्वात आणले आहेत. केवळ, कार्पोरेट उद्योजकांसाठी, अदानी-अंबानींसाठी हे कायदे करण्यात आल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.