ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सोलापुरात रास्ता रोको आंदोलन

सोलापूर :  मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्या अनुषंगाने सोलापुरात माजी आमदार श्री. आडम व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी गेंट्याल चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना  पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर, पाण्याचा मारा, अटकसत्र करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, देशाच्या कृषिप्रधान राज्यातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीत दाखल होत आहेत. याचा अर्थ शेतकरी आता माघार घेणार नाही. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सबंध देशभरातून कामगार व शेतकरी उत्स्फूर्त पाठिंबा देत आंदोलनात उतरलेले आहेत. शेतकरी-कामगार विरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला.

यादरम्यान पोलिस प्रशासनाचा फौजफाटा तैनात झाला. कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत चालू होता. अचानक 11.20 वाजता श्री. आडम गेंट्याल चौक येथे गाडीतून उतरताच गुप्तपणे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी चारही रस्ते नाकाबंदी करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.   या वेळी बॅनर, फलक, झेंडे घेऊन महिला, विद्यार्थी, युवक आणि कामगार उन्हात रस्त्यावर बसले. पोलिसांची प्रचंड दडपशाही चालू होती. तरीही कार्यकर्ते रस्त्यावरून उठले नाहीत. अखेर पोलिसांना बळाचा वापर करून ताब्यात घ्यावे लागले. या वेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चांगलीच झटापट झाली.

या वेळी सिटूचे राज्य महासचिव ऍड. शेख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील संपूर्ण कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकू शकत नाही. तसे झाल्यास ही लढाई अखंड चालू राहील, असा इशारा दिला. या वेळी नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, म .हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!