अक्कलकोट दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील अंबाभवानी नवरात्र जनकल्याण प्रतिष्ठानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महोत्सव रद्द केला आहे.
दरवर्षी नवरात्र महोत्सवनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने अंबाभवानी मंदिर परिसरात होणारे पुराण, चंडी होम, कुंकुमार्चन, सांस्कृतिक कार्यक्रम, सुहासिनीचा ओटी भरण कार्यक्रम, नवरात्र यात्रा महोत्सव आदी विविध कार्यक्रम हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत होत असतात.यंदा कोरोनाचे संकट असल्याने नित्योपचार रुद्राभिषेक,दर्शन व्यतिरिक्त इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री गुरु बमलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री.ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले. जनकल्याण प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत यंदाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सिद्राम हेगडे, कार्याध्यक्ष शिवराया हिपरगी, सचिव जगदीश प्रचंडे, खजिनदार गजानंद प्रचंडे ,सदस्य शिवपुत्र धनशेट्टी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना ही दिवसेंदिवस वाढत असल्याने देवी भक्तांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शासनाने सांगितल्याप्रमाणे स्वतः मास्क वापरावे, सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवावेत असे आवाहन याप्रसंगी नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजीनी भक्तांना आशीवर्चन करताना केले.