ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाने हिरावले अनेकांचे व्यवसाय; अनेक तरुण झाले बेरोजगार; विश्व न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

 

दुधनी दि.७ : कोवीड-19 ला अटकाव घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात संपूर्ण देशात नव्वद दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला होता. संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित होताच देशातील सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आले होते. विमानसेवा, बससेवेसह रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली. या लॉकडाउनचा परिणाम अजूनही शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या व्यवसायावर पडला आहे.

सद्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध प्रकारच्या अटीं-शर्तींसह शिथिलता देत अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सद्याच्या घडीला राज्यात मंदिर, शाळा आणि रेल्वे सेवा बंद आहेत. रेल्वे सेवा बंद असल्याने त्याचे विपरीत परिणाम शहरातील विविध व्यावसायिकांवर झाला आहे.

दुधनी शहर हा कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं व्यापारी शहर. दुधनी शहरात पूर्वी पासून रेल्वे स्थानक आहे. यामुळे दुधनी शहराला विशेष महत्त्व आहे. येथील रेल्वे स्थानकावर देशातील विविध ठिकाणी जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसाह पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळते. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, तामिळनाडू, तिरुपती, श्रीशैलं या ठिकाणी जाण्यासाठी दुधनी आणि आजू बाजुच्या परिसरातील नागरिक येथील रेल्वे स्थानक गाठतात. यामुळे दुधनी रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी होत असते. याचा फायदा येथील हॉटेल, चहाचे स्टाँल, भेळ विक्रेत्यांना, पानपट्ट्यांना, रिक्षावाल्यांना होत होता. मात्र सद्या नेमक्या एक्सप्रेस गाड्या चालू असून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने या रेल्वे गाड्यांमध्ये फिरून व्यवसाय करणाऱ्याबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. यामध्ये प्रमुख व्यवसाय म्हंटलं तर हॉटेल व्यवसाय. हॉटेल व्यवसाय सद्या अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. नागरिक हॉटेलांमध्ये खाण्या पिण्याच्या भानगडीत न पडता घरीच खाणं पसंद करत आहेत. कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे छोट्या व्यावसाय करणाऱ्या युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रवासावर अटी- शर्ती आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावी लागत आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने दुधनी रेल्वे स्थानक परिसरात सद्या शुकशुकाट पसरलेला आहे. त्याचा परिणाम येथील हॉटेल, पानपट्टी, भेळ यासारख्या व्यवसाय करणाऱ्यांवर झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या बरोबर शहरातील रिक्षा चालकांचा देखील व्यवसाय बंद झाला आहे.

कारण दुधनी बस स्थानकापासून रेल्वे स्थानक हे अडीच किलोमीटर अंतरावर आहे. बस स्थानकातुन स्टेशनला जाण्यासाठी अनेक जण पायी जाण्यापेक्षा ऑटो रिक्षांचा वापर करतात. त्यामुळे दररोज चाळीस ते पन्नास ऑटो रिक्षा रस्त्यावर धावत असतात. मात्र सद्या नेमकेच रिक्षा रस्त्यावर धावत असून बाकीच्यांसमोर रोजगारीचे संकट उभं राहिले आहे.

दुधनी शहरात कुठल्याही प्रकारचे मोठे व्यवसाय नाहीत. इथे ना मोठे कारखाने आहेत ना कंपन्या आहेत. त्यामुळे येथील अनेक युवक बेरोजगार होऊन फिरत आहेत. त्यांना या पुढे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या बेरोजगार युवकांना सद्या शेती व्यवसाय किंवा आडत दुकानां शिवाय दुसरं पर्याय नाही. अन्यत्र जाऊन कामाला जावं म्हंटलं तर सोलापूर किंवा कलबुर्गी शहरात जावं लागतं. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी येणारं वाहतूक खर्च परवडत नाही. यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती येथील युवकांसमोर निर्माण झाला आहे.
त्यामुळे जितकं लवकर होईल तितकं लवकर पॅसेंजरसहित लोकल रेल्वे सुरू व्हावेत, अशी मागणी येथील युवकांसाहित अनेक नागरिक करीत आहेत. अन्यथा बेरोजगारी आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बेरोजगार युवकांच्या हातात लवकरात लवकर धंदा मिळणे गरजेचे आहे.

गुरुशांत माशाळ, दुधनी
मो. नं. : ८८८८६२७४८५

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!