अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कोराना लस अखेर अक्कलकोटमध्ये दाखल झाली असून त्याचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना स्वामी यांनी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीबद्दल विश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले.लस घेत असताना कुठल्याही प्रकारची रिएक्शन झालेली नाही.अफवांवर विश्वास ठेवू नका,आपला तालुका कोरोना मुक्त करायचा असेल तर या लसीचा लाभ घ्यावा व इतरांनाही यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अक्कलकोट तालुक्याला पहिल्या टप्प्यात ६४० डोस प्राप्त झाले असून त्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचारी म्हणजेच आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येत आहे.शनिवारी शंभर जणांना ही लस देण्यात आली.रोज शंभर जणांना ही लस दिली जाणार आहे. एकूण बारा सत्र होणार असून १ हजार १५८ लाभार्थी आहेत.२३ जानेवारीपर्यंत ही मोहीम चालेल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोमोरबीड रुग्ण,पोलीस कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील लोकांना ही लस मिळणार आहे.तिसऱ्या टप्प्यामध्ये सामान्य नागरिकांना ही लस उपलब्ध होईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी सांगितले.पहिला डोस हा इसमोद्दीन काझी यांना देण्यात आला.
त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सत्कार केला.यावेळी गटविकास अधिकारी महादेव कोळी, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड, ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे, डॉ.नीरज जाधव, महेश भोरे, ग्रेस काकडे, इसमोद्दीन काझी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.