अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण शनिवारी रात्री उशिरा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. यामुळे तालुक्यातील शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.
दरम्यान आता धरण शंभर टक्के भरल्याने आज (रविवार) सकाळपासून धरणातून २०० क्युसेक पाणी खाली सोडण्यात येणार आहे.प्रारंभी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात येणार आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून धरण कधी भरणार याची प्रतीक्षा तालुकावासियांना लागली होती.त्यादृष्टीने पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु मागच्या पंधरा ते वीस दिवसात तुळजापूर आणि नळदुर्ग परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे धरणात रोजच्या रोज पाण्यात वाढ होऊन शनिवारी सायंकाळी हे धरण ८२२ दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने भरले आहे.आता यापुढच्या काळात धरणांमध्ये येणारा जो विसर्ग आहे त्या प्रमाणात धरणांमधून पाणी खाली सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बोरी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना तसेच नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यावर नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे,अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी दिली. कुरनूर धरणावरती तीन नगरपालिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्याशिवाय दरवर्षी दोन वेळा धरणातून पाणी सोडले जाते. आता धरणे शंभर टक्के भरल्याने पुढील वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.