बीड: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३२ अधिकारी कर्मचारी निलंबित झाले आहेत. १६७ गुत्तेदार मजूर संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून वसुली देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी दोन अधिकारी पुन्हा निलंबित करण्यात आले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये अंबाजोगाई आणि बीड उपविभागीत कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ आणइ तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडून वसुलीही करण्यात येणार आहे.
जलयुक्तच्या कामांच्या घोटाळ्याची चौकशी केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत 41 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. पहिल्या टप्प्यात ही वसुली होणार असून हा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभाग आणि विधिमंडळातील महालेखा विभागामार्फत ऑडिट करण्याची मागणी वसंत मुंडे यांनी केली. त्यानंतर सरकारने एक समिती नेमली आणि 4 डिसेंबरला दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.