भोपाळ : नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली.
“जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. ते आम्हाला आज पूर्ण करावं लागत आहे. कृषी कायदे काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. यावर गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहोत”, असं मोदी म्हणाले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
‘मागील सरकारच्या पापाचं प्रायश्चित’
शेतकऱ्यांना फक्त आडतीमध्ये बांधून मागील सरकारनं जे पाप केलं, त्याचं प्रायश्चित म्हणजे हे कृषी कायदे असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय. देशात कृषी कायदे लागू होऊन 6 महिने लोटले पण देशातील एकही मार्केट कमिटी बंद झालेली नाही. मग विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम का सुरु आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केलाय.
‘MSPला कुठलाही धोका नाही’
मागील सरकारच्या काळात गहू 1400 रुपये किमान आधारभूत अर्थात MSP किंमत मिळायची. आम्ही 1975 रुपये MSP देत आहोत. मागील सरकार धानाला 1310 रुपये एमएसपी देत होते. आम्ही ती 1870 रुपये केली. यावरुन आमचं सरकार MSPला किती महत्व देतं हे सिद्ध होतं. आम्हाला MSP हटवायची असती तर स्वामीनाथ कमिटीचा अहवाल आम्ही लागूच केला नसता. मी शेतकऱ्यांना विश्वास देतो की MSP बंद होणार नाही, अशा शब्दात नव्या कृषी कायद्यात MSP ला कुठलाही धोका नसल्याचा विश्वास मोदींनी दिला आहे.