सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये एका डंपरने 20 जणांना चिरडले. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजूर होते आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.
सोमवारी रात्री किम-मांडवी मार्गावरीस पालोडगाम जवळ ही दुर्घटना घडली. फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाला डंपरने चिरडले. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जणांना गंभीर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालक आणि क्लिनरला अटक केली आहे.
मृतांमधील राकेश रूपचंद घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका दुकानात काम करत होता. तो दररोज दुकानाजवळील एका केबिनमध्ये झोपायचा. मात्र सोमवारी केबिनऐवजी तो मजुरांसोबत फुटपाथवर झोपला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. डंपरच्या धडकेत 4-5 दुकानांचे शेड देखील तुटले आहेत.
ट्रॅक्टरला धडकल्यानंतर ट्रक अनियंत्रित झाला
पोलिसांनी सांगितले की, डंपरची ऊसाच्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली. या धडकेनंतर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर फुटपाथवर गेला.
मोदींनी व्यक्त केला शोक, मदतीची केली घोषणा
पंतप्रधान म्हणाले की, जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहोत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.