मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असतानाच वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपा व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चर्चेवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. हैदराबाद महापालिकेत मुसंडी मारल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल. मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले, जाऊ द्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नाहीत. मी नाशिकलाही आता बोलतोय की, पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.