मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आज प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे.
भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो. असा खोचक टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर आज उस्मानाबादमध्ये आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.