मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाकयुद्ध अधिक तीव्र झालं असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला.
जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राणेंवर खोचक शब्दात टीका केली होती. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. दरम्यान, आता, जयंत पाटील यांना नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपात असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती” असा खळबळजनक दावा राणेंनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे, असेही राणे म्हणाले. पुढचं सरकार आमचंच येणार असे जयंत पाटील म्हणताहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असणार असे त्यांना म्हणायचे असेल, असा टोलाही राणे यांनी लगावला.