---Advertisement---

डोंबिवलीत पैसे वाटपाचा आरोप, भाजप–शिंदे गट आमने-सामने

By team
On: January 11, 2026 6:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनेक ठिकाणी युती असली तरी डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. मात्र याच प्रभागात पैसे वाटपाच्या आरोपावरून मोठा वाद उफाळून आला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन इमारतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक घरातील मतदाराला तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. या आरोपानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून निवडणुकीच्या प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजपचे तीन पुरुष आणि एक महिला कार्यकर्त्याला रंगेहाथ पकडले. त्यांच्या जवळून सुमारे 70 ते 80 हजार रुपयांची रोख रक्कम आढळल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच संबंधित घरात अनेक पैशांची पाकिटे सापडल्याचेही सांगण्यात येत आहे.

ज्या ठिकाणी ही पाकिटे सापडली, त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. संशयित कार्यकर्त्यांना पकडून ठेवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परत घटनास्थळी पोहोचताच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीतील निवडणूक प्रचार अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!