मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा एकदा वेग आला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली असून, शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी केलेल्या एका महत्त्वाच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी 2019 मधील कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या प्रकरणाचा दाखला दिला. तसेच या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नसल्याचा दावा केला.
शिंदे गटाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. तसेच विधानसभा सदस्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरपर्यंत अपात्र ठरवायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचेही मेहता यांनी न्यायालयात मांडले.
या युक्तिवादामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात नवा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या भूमिकेसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय भूमिका घेते आणि पुढील सुनावणीत काय घडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









