---Advertisement---

बालाजी सरोवरमध्ये भाजपच्या पॅनेलसाठी जोरदार खलबते; सांगोल्याचा तिढा सुटणार का?

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC) संचालक मंडळ निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी भाजप आणि समविचारी पक्षांच्या पॅनेलमधील उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला. शहरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी संभाव्य उमेदवारांची नावे आणि राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा केली. त्यामुळे भाजपच्या अंतिम पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हॉटेल बालाजी सरोवरमधील ५०१ आणि ५०६ क्रमांकाच्या खोल्यांमध्ये नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, दिलीप माने, संजयमामा शिंदे, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे-पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, रणवीर राऊत, मिलन कल्याणशेट्टी, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापूरे आणि शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

यापूर्वी सोमवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर पॅनेलची अंतिम यादी निश्चित करण्याची जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार राजन पाटील यांच्यावर सोपविण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय प्रतिनिधित्व, इच्छुकांची संख्या, स्थानिक नेत्यांचे प्रभावक्षेत्र आणि निवडणुकीतील विजयाची शक्यता या मुद्द्यांवर विचारमंथन सुरू असल्याचे समजते.

सांगोल्याच्या जागेवरून पेच कायम?

या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये सांगोला तालुक्याची जागा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील या दोघांपैकी भाजपच्या संभाव्य पॅनेलमध्ये कोणाला स्थान मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असल्याने सांगोल्यातील राजकीय पेचावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या एका जागेवरील निर्णयाचा परिणाम पॅनेलच्या अंतिम रचनेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोहिते-पाटील गटाला बाजूला ठेवण्याची रणनीती?

दुसरीकडे, मोहिते-पाटील गटाला बाजूला ठेवून भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या भूमिकेमुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. एका बाजूला बालाजी सरोवरमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू होती, तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

त्यामुळे बालाजी सरोवरमधील बैठक आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या अंतिम पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळते, कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाला नव्याने राजकीय संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!