सोलापूर वृत्तसंस्था : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी 10 जागांवर पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. विशेष म्हणजे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हेदेखील भाजप पुरस्कृत पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत.
या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, पृथ्वीराज माने आणि श्रीदीप हसापुरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनेलने निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
दरम्यान, संचालक मंडळाच्या उर्वरित 9 जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या जागांसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पणन आणि दुग्ध संस्था या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच मोहिते-पाटील यांच्यासह सहा माजी संचालकांच्या अपात्रतेविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 16 नोव्हेंबर रोजी फेटाळली आहे.
या विजयाबाबत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सक्षम उमेदवार देण्याचा निकष ठेवण्यात आला होता. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण आणि राजन पाटील यांनी मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, जागावाटपावर एकमत न झाल्याने निवडणूक लागली. तसेच बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, 19 पैकी 10 जागांवर बिनविरोध विजय मिळवत भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलने सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मजबूत पकड निर्माण केली आहे. आता उर्वरित 9 जागांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










