मुंबई वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे गरजेच्या वेळी खातेधारकांना अधिक रक्कम काढता येणार असल्याचा दावा केला जात आहे.
EPFO बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार, पीएफ खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे खातेधारकांना आपल्या पीएफमधील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, पैसे काढण्यासाठी लागू असलेल्या अटी कायम राहणार आहेत.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये जमा असतील, तर नव्या प्रस्तावानुसार त्याला किमान 1 लाख रुपये खात्यात ठेवावे लागतील. म्हणजेच उर्वरित 9 लाख रुपये काढण्याची सुविधा मिळू शकते.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय
या निर्णयासोबतच EPFO बोर्डाने सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन (SWP) मंजूर केला आहे. या सुविधेमुळे निवृत्तीनंतर पीएफमधील संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी ठरावीक हप्त्यांमध्ये पैसे घेता येणार आहेत. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित आर्थिक आधार मिळण्यास मदत होईल.
एकूणच, EPFO च्या या निर्णयामुळे पीएफ खातेधारकांना आपल्या बचतीचा अधिक वापर करता येणार असून, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही आर्थिक नियोजनासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.









