---Advertisement---

ऊस दरावर तोडगा नाहीच! 3150 रुपयांवर कारखानदार ठाम; 22 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था : जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष कायम आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत तब्बल अडीच तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीतही ऊस दरावर कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही.

बैठकीच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटनांनी उसाला प्रतिटन 3 हजार 500 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली. मात्र, साखर कारखानदारांनी 3 हजार 150 रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास असमर्थता दर्शवली. शेतकरी संघटना 3 हजार 500 रुपयांच्या मागणीवर ठाम राहिल्यास कारखाने बंद ठेवण्याची भूमिका कारखानदारांनी मांडली.

यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत पहिली उचल 3 हजार 250 रुपये आणि गाळप हंगाम संपल्यानंतर प्रतिटन 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.

दुसरीकडे, शेतकरी संघटना आपल्या मागणीवर ठाम आहेत. पहिली उचल 3 हजार 300 रुपये, गाळप हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी 100 रुपये, असा एकूण 3 हजार 500 रुपये दर मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, कार्तिकी वारीमुळे पुढील दोन ते तीन दिवस कारखानदारांच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले. कारखानदारांनी समाधानकारक निर्णय न घेतल्यास 22 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आता साखर कारखानदार दोन दिवसांत काय निर्णय घेतात, प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी देतात का आणि ऊस दराचा तिढा सुटतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!