सोलापूर वृत्तसंस्था : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोणाचेही नाव न घेता मोहिते पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. काही लोकांनी मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरून बँकेची निवडणूक लढवण्याची तयारी केली; मात्र अखेर जनतेच्या मनात जे होते तेच होणार, असा टोला त्यांनी लगावला.
जयकुमार गोरे म्हणाले की, आमच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार 35 वर्षांच्या आतील आहेत. इतक्या तरुण उमेदवारांच्या हाती जाणारी राज्यातील ही एकमेव बँक असेल. यापूर्वी बँकेत काम केलेले उमेदवारांमध्ये केवळ प्रशांत परिचारक आहेत. सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, बाबासाहेब देशमुख यांच्यासह इतर सर्वजण बँकेसाठी नवीन आहेत.
पुढे बोलताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला. काही लोकांनी मोठ्या बैठका घेतल्या, संपूर्ण जिल्हाभर फिरून बँकेची निवडणूक लढवण्याची तयारी केली. सगळ्यांनाच चिंता होती की आता काय होणार? मात्र, सिद्धरामेश्वर आणि जनतेच्या मनात जे होते, तेच होईल, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.










