सोलापूर, प्रतिनिधी : श्रमिक-कष्टकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात पेटून उठलेल्या सोलापूरच्या कामगार चळवळीने आज सरकारला आपली ताकद दाखवून दिली. हजारो कामगार, महिला, कष्टकरी आणि रे नगरचे लाभार्थी सोलापूर ते मुंबई पायी लाँग मार्चसाठी रस्त्यावर उतरले. सात हजारांहून अधिक आंदोलकांच्या प्रचंड उपस्थितीने सोलापूरच्या रस्त्यांवर लाल बावट्याचा बुलंद आवाज घुमला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांबाबत बैठक घेऊन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा लाँग मार्च तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची घोषणा ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर सभेत केली.
३१ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सरकारला आणि पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गनिमी काव्याने मुंबई मंत्रालयावर धडक देऊ, असा आक्रमक इशाराही कॉ. आडम मास्तर यांनी दिला. त्यामुळे हा लढा संपलेला नसून शासनाला दिलेली ही केवळ मुदत आहे, असा स्पष्ट संदेश या सभेतून देण्यात आला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) च्या नेतृत्वाखाली आयोजित या लाँग मार्चसाठी सोमवारी, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून हजारो महिला, पुरुष कार्यकर्ते, कामगार आणि लाभार्थी प्रवासाचे साहित्य व एक वेळच्या जेवणाचा डबा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात झाली. दुपारी १२.३० वाजेपर्यंत सात हजारांहून अधिक आंदोलकांचा जनसागर चौकात लोटला होता. सोलापूर प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने क्रांतिकारी गीतांच्या माध्यमातून आंदोलकांमध्ये संघर्षाची ऊर्जा निर्माण केली. अर्धा तास बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रशासनाचा बंदी आदेश, पण कामगारांचा निर्धार कायम!
CITU च्या वतीने या लाँग मार्चसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करून लाँग मार्चला परवानगी नाकारली. तरीही कामगारांच्या न्याय्य मागण्यांचा आवाज दडपता येणार नाही, हा निर्धार घेऊन हजारो आंदोलक एकत्र आले. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मागण्यांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णयासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी बैठक आयोजित करून सर्व मागण्यांचा सविस्तर अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर लाँग मार्च तात्पुरता स्थगित करण्यात आला.
या आहेत कामगार-कष्टकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या!
1. रे नगर फेडरेशनच्या लाभार्थ्यांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता २५० कोटी रुपयांचे बीज भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि प्रलंबित गृहकर्जाचा प्रश्न तातडीने सोडवावा. पायाभूत सुविधांसाठी २२४ कोटी रुपये मंजूर असून आणखीन १६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
2. कॉ. गोदूताई परुळेकर नगरमध्ये अंतर्गत पक्के रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत.
3. विडी कामगारांना शासनाने घोषित केलेल्या किमान वेतनाची तातडीने अंमलबजावणी करावी.
4. यंत्रमाग कामगारांना पीस रेटनुसार न्याय्य किमान वेतन लागू करावे.
5. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून बंद केलेल्या कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू कराव्यात.
6. असंघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन लागू करावी.
७. रे नगर मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय केलेला असून त्यासाठी अनुदानाची तरतूद करावी.
या मागण्या केवळ कामगारांच्या नसून सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेच्या जगण्याशी निगडित आहेत. घर, रोजगार, वेतन, पेन्शन, पाणी आणि मूलभूत नागरी सुविधा या जनतेच्या हक्काच्या मागण्या आहेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला आता जनतेच्या एकजुटीची ताकद अनुभवावी लागेल, असा सूर सभेतून व्यक्त करण्यात आला.
लढा स्थगित, संघर्ष नाही!
जाहीर सभेला संबोधित करताना कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाचा आदर करून कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी लाँग मार्च तात्पुरता स्थगित केला आहे. मात्र, ३१ डिसेंबरपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर कामगार-कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मंत्रालयावर धडक देतील. शासनाने या इशाऱ्याला गांभीर्याने घ्यावे.
यावेळी सीटू चे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख, जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा कॉ. नसीमा शेख यांनीही सभेला संबोधित केले. त्यांनी कामगारांच्या एकजुटीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सभेचे प्रास्ताविक सीटू चे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी केले.
मंचावर कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कामिनीताई आडम, कॉ. सुनंदाताई बल्ला, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. म. हनीफ सातखेड, कॉ. दत्ता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहीर सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड कॉ.अनिल वासम यांनी केले.
शेवटी उपस्थित हजारो कामगार, कष्टकरी आणि नागरिकांनी रस्त्यावरच सामूहिक भोजन केले. त्यानंतर जाहीर सभेचा आणि सोलापूर ते मुंबई पायी लाँग मार्चच्या नियोजित कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
लाल बावट्याचा संघर्ष थांबलेला नाही; सरकारला दिलेली मुदत संपेपर्यंत कामगारांचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार या ऐतिहासिक सभेतून व्यक्त करण्यात आला!










