लातूर वृत्तसंस्था : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सहकार पॅनलने १९ पैकी १४ जागांवर विजय मिळवला असून, भाजपच्या परिवर्तन पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि भाजपचे नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सहकार पॅनलने बहुमत मिळवले असले तरी भाजपच्या परिवर्तन पॅनलनेही पाच जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे.
निलंग्यात अरविंद पाटील निलंगेकर यांचा मोठा विजय
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या निलंगा मतदारसंघातून भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. या विजयामुळे अरविंद पाटील निलंगेकर यांनी पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवेश केला आहे.
९९.४ टक्के मतदानाची नोंद
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली होती. एकूण ९९९ मतदारांपैकी ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे या निवडणुकीत ९९.४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये या निकालामुळे काँग्रेसच्या सहकार पॅनलने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. तर पाच जागांवरील विजयामुळे भाजपच्या परिवर्तन पॅनलनेही जिल्हा बँकेच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर देशमुखांच्या सहकार पॅनलचा झेंडा!
On: November 16, 2026 12:42 PM
---Advertisement---











