भिवंडी, वृत्तसंस्था : मशीनचा धागा तुटल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची घटना भिवंडीतील पोगाव परिसरात घडली. जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दोन परिचित तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर कैचीने वार करण्यात आले. या घटनेत दोन्ही बाजूंचे तरुण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीन्स कारखान्यात काम करत असताना मशीनचा धागा तुटल्याच्या कारणावरून इमरान आणि रेहान यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद पुढे वाढत जाऊन दोघांनी एकमेकांवर कैचीने वार करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघांचाही राग शांत झाला नाही.
यानंतर हा संघर्ष कारखान्याबाहेर रस्त्यावर पोहोचला. इमरान आणि त्याच्या भावाने रेहानचा पाठलाग करून त्याला रस्त्यात गाठले आणि त्याच्यावर कैचीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, भिवंडी तालुका पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. इमरानच्या तक्रारीवरून रेहानविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2) अंतर्गत, तर रेहानच्या तक्रारीवरून कलम 109 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका तक्रारीत दोन, तर दुसऱ्या तक्रारीत एका आरोपीचा समावेश आहे. सुहेल नामक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून कारखाना आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याद्वारे घटनेचा नेमका घटनाक्रम समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मशीनचा धागा तुटण्यासारख्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट कैचीने हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.










