कुलगाम, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये संघटनेचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद लतीफ भट याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच कुलगाममध्ये सुरक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्यात लतीफ भटचा सहभाग असल्याचा संशय होता.
या कारवाईत भारतीय लष्करासोबत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा जवानांवर हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोहीम तीव्र केली होती. या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून लतीफ भटचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह काश्मीरमध्ये दाखल झाले होते. त्याचवेळी सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू होती. या पार्श्वभूमीवर कुलगाममधील कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक संदीप खिरवार यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना या कारवाईसंदर्भात माहिती दिली. ११ नोव्हेंबर रोजी सुरक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. हल्लेखोरांबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांना आधीच मिळाली होती, असे त्यांनी सांगितले.
या कारवाईमुळे कुलगाममधील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र, परिसरातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता सुरक्षा दलांकडून सतर्कता कायम ठेवण्यात आली आहे.









